AmravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीतील प्रभात चौकात युवकाची निर्घृण हत्या; अवघ्या दोन तासांत तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

अमरावती शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असताना, प्रभात चौक परिसरात घडलेल्या एका खळबळजनक हत्येने शहर पुन्हा हादरले आहे. भांबोरे वाईन शॉपजवळ एका युवकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत तपासाला वेग दिला आहे.

२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री प्रभात चौकातील भांबोरे वाईन शॉपजवळ, फॅशन टेलरसमोर ही घटना घडली. शरीफ बेग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त शाम घुगे, यशवंत सोलंके, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे तसेच सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे आणि नमुने जप्त करून तपास सुरू केला.

पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करून शोधमोहीम राबवली आणि अवघ्या दोन तासांत तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यामध्ये शेख रेहान शेख हारुण (वय २७, सुफियान नगर), शेख नुरेन शेख इरफान (वय २१, सबा नगर) आणि इरफान खान उर्फ गोलू जावेद खान (वय २७, अकबर नगर) यांचा समावेश आहे. यापैकी एका आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी, तर उर्वरित दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात पैशांच्या व्यवहारातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी नेमके कारण काय होते याचा सखोल तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी भांबोरे वाईन शॉप परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. वाईन शॉपलगत मद्यपानाची व्यवस्था असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वारंवार वाद, भांडणे आणि गोंधळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, रात्रीच्या वेळी महिलांना या मार्गाने जाणे असुरक्षित वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या हत्येमुळे अमरावती शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. खुनामागचा नेमका हेतू, आणखी आरोपींचा सहभाग आणि तपासातून समोर येणारे नवे धागेदोरे याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button