Latest NewsMaharashtra

खुलताबादमधील सुलीभंजन दत्तधाम तपोभूमीचा वेगाने विकास; ४०–४५ कोटींची कामे अंतिम टप्प्यात

खुलताबाद तालुक्यातील निसर्गरम्य सुलीभंजन दत्तधाम तपोभूमी परिसरात गेल्या काही वर्षांत विकासाची मोठी भर पडली असून मंदिर परिसराचा पूर्ण काया पालट होत आहे. विविध लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिलेल्या निधीमुळे भाविक आणि पर्यटकांसाठी आधुनिक सुविधा मोठ्या प्रमाणात उभारल्या जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरापासून केवळ सात किलोमीटरवर असलेले हे ऐतिहासिक तीर्थक्षेत्र अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. सध्या येथे ४० ते ४५ कोटी रुपयांच्या विकासकामांना गती मिळाली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पालकमंत्री संजय शिरसाठ, आमदार प्रशांत बंब, खासदार संदिपान भुमरे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, तसेच विधान परिषद सदस्य संजय केनेकर यांनी आपल्या निधीतून मोठा वाटा उचलला आहे.

या निधीच्या सहाय्याने भव्य सभा मंडप, सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची टाकी, भक्तनिवास, तसेच सूर्यकुंड व चंद्रकुंडाचे सुशोभीकरण अशी महत्त्वपूर्ण कामे जलदगतीने पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहेत. या विकासामुळे संपूर्ण सुलीभंजन पर्वत परिसराचा चेहरामोहरा बदलत असून भविष्यात पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर अधिक आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी माहिती मंदिराचे सचिव संजय भंडारी यांनी दिली.

अलीकडेच येथे दत्त जयंती जन्मोत्सवाचा महापर्व मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सोहळ्याचा समारोप ह.भ.प. उद्धव महाराज आनंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे, सरपंच नितीन जाधव, शंकरराव आधाने, द्वारकादास घोडके, माजी उपनगराध्यक्ष भागिनाथ मरकड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button