Latest NewsMaharashtraThane

ठाणे महापालिकेत वारसा हक्काने २५ कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती; आतापर्यंत ३०० जणांना सेवा संधी

ठाणे : ठाणे महापालिकेत वारसा हक्काच्या आधारे सेवेत घेतलेल्या २५ कर्मचाऱ्यांना नुकतीच कायम नियुक्ती देण्यात आली आहे. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत एकूण ३०० कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने महापालिकेच्या सेवेत कायम केले गेले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती झाल्याने संबंधित कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार व महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आस्थापना विभागाने विशेष मोहीम राबवून ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केली.

लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार, सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेच्या सेवेत संधी दिली जाते. या प्रक्रियेत नियुक्त कर्मचाऱ्यांना तीन वर्षांच्या सेवा कालावधीनंतर कायम करण्यात येते. या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नियमानुसार निवड करण्यात आली.

या २५ कर्मचाऱ्यांमध्ये वर्ग ३ मधील १ आणि वर्ग ४ मधील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील काही कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप आणि आस्थापना अधीक्षक रश्मी कांबळी आदी उपस्थित होते.

आतापर्यंत ठाणे महानगरपालिकेत वर्ग ३ मधील ४७ आणि वर्ग ४ मधील २५३ अशा एकूण ३०० कर्मचाऱ्यांना वारसा हक्काच्या आधारे सेवा संधी देण्यात आली असून, ही भरती प्रक्रिया पालिकेच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button