citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात १०५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त; १३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत, एक आरोपी ताब्यात

सामाजिक सुरक्षा पथक व गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा, एक आरोपी फरार

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून सामाजिक सुरक्षा पथक आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत १०५.०२० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अमली पदार्थांसह वाहन, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा एकूण १३ लाख ३० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर शहरातील न्यू नरसाळा रोड परिसरात स्वस्त धान्य दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. कारवाईदरम्यान सलीम साजिद खान (वय ४८) याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या ताब्यातून १०५.०२० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत १० लाख ५० हजार २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय एक बर्गमन दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि पिवळ्या धातूची अंगठी जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १३ लाख ३० हजार २०० रुपये इतकी आहे.

या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी संजय उर्फ कालिया हा फरार असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून या कारवाईमुळे नागपूरमधील अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. या रॅकेटशी संबंधित आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागपूर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात सुरू केलेली मोहीम अधिक तीव्र केली असून अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा या धाडीतून देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button