AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

गडगडेश्वर मंदिरासमोर तरुणाकडून दोन धारदार चाकू जप्त; अमरावती गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी २१ वर्षीय आरोपीवर आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा; शहरातील विशेष मोहिमेला वेग

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखेने आणखी एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. गडगडेश्वर मंदिरासमोर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन धारदार चाकू जप्त करण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शहरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या पोलिस आयुक्तांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्याच मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गडगडेश्वर मंदिरासमोर एक संशयित तरुण घातक शस्त्रांसह उभा आहे.

या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयिताला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला लपवून ठेवलेले दोन धारदार चाकू आढळून आले. यामध्ये एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा ‘चायना’ चाकू असा एकूण सुमारे १,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव जाहेद शाह आबिद शाह (वय २१) असून तो मुस्तफा नगर, हैदरपुरा, अमरावती येथील रहिवासी आहे.

या प्रकरणी खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध आर्म अॅक्टच्या कलम ४, २५ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शहरातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांचे लक्ष असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button