धारणीत मुसळधार पाऊस, ढाकणा फाटा रस्त्यावर वाहतंय पाणी

धारणी – धारणी तालुक्यासह शहरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाची सुरूवात झाली. अख्खी रात्र पाऊस कोसळत राहिल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. विशेषतः ढाकणा व भोकरबर्डी फाट्यावरील मुख्य रस्त्यावर पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहनधारक आणि पादचारी दोघांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर दरवर्षी पाणी वाहून जात असून अपघात होतात, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धारणी नजिकच्या ढाकणा फाट्यावर रस्त्यावरून पाणी वाहत आहे, परंतु नाले बांधकाम, पाणी वाहून नेण्यासाठी योग्य ड्रेनेज व्यवस्था नसल्याने परिस्थिती वर्षानुवर्षे तीच आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



