नवरात्री 2025: अंबादेवी मंदिरात नवरात्री उत्सवाचा प्रारंभ

अमरावती – अमरावती शहराचे श्रद्धास्थान असलेल्या अंबादेवी मंदिरात नवरात्री महोत्सवाला पहाटे साडेचार वाजता देवीच्या अभिषेकाने सुरुवात झाली. मंत्रोच्चारांच्या पवित्र जयघोषात हा अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर लगेचच घटस्थापना करण्यात आली आणि त्यानंतर देवीचा मनमोहक शृंगार करण्यात आला.
सकाळी साडेसात वाजता देवीची पहिली आरती झाली. या वेळी संस्थानचे सचिव डॉ. जयंत पांढरीकर आणि त्यांच्या पत्नी यांनी घटस्थापनेच्या पूजेत सहभाग घेतला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी मंदिराचे प्रवेशद्वार अभिषेक सुरू असतानाच खुले करण्यात आले होते. हजारो भाविकांनी पहाटेपासूनच देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
मंदिरातील गर्दी लक्षात घेता, महिलांसाठी ओटी भरण्याची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानचे सचिव डॉ. जयंत पांढरीकर यांनी परदेशात असलेल्या भाविकांना सिटी न्यूजच्या माध्यमातून देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहराचे दैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनासाठी देशभरातून आणि परदेशातूनही भाविक येत असतात.



