मराठा आरक्षणानंतर ओबीसींची एकजूट; मुंबईत दोन दिवस महत्त्वाच्या बैठका

मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत असतानाच, आता ओबीसी समाजही एकवटला आहे. पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.
आज ओबीसी नेत्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात आली असून, उद्या इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक पार पडणार आहे. या बैठकीत ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
४ सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा समारोप झाला होता. त्यावेळी मंत्री अतुल सावे यांनी शासनस्तरावर लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रेची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात नवा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत असून, आगामी काळातील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



