अकोल्यात सोयाबीन शेतकरी दुहेरी संकटात; अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने चिंता

अकोला जिल्ह्यातील शेतकरी सध्या मोठ्या संकटाला सामोरे जात आहेत. आधीच झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यानंतर आता सोयाबीन पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे.
गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पिके पाण्याखाली गेली. परिणामी पिके सडून उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याचदरम्यान शेतकऱ्यांना आता कीडरोगांचा सामना करावा लागत आहे.
सोयाबीनसह तूर, मका आणि कापूस पिकांवर रोगराई पसरली आहे. विशेषतः सोयाबीन पिकांवर पाने खाणारी आणि शेंगा पोखरणारी अळी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात तर प्रत्येक झाडावर ३० ते ४० अळ्या असल्याचे दिसून येत आहे. या अळ्या झपाट्याने पाने आणि शेंगा दोन्ही नष्ट करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
कृषी तज्ज्ञांच्या मते, पिकावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित सर्वेक्षण करणे, तणमुक्त शेती राखणे आणि आवश्यकतेनुसार जैविक कीटकनाशकांचा वापर करणे गरजेचे आहे. निंबोळी अर्क, अझाडिरॅक्टिन आणि बॅसिलस थुरिंजिएन्सिस यांचा वापर प्रभावी ठरू शकतो, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून योग्य मार्गदर्शन करावे. सततच्या पावसाने आणि आता वाढलेल्या अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.



