महाराष्ट्रात ‘इथं’ पडतोय ढगफुटीसदृष्य पाऊस! गुरं दगावली, लोक अडकले, आर्मीची मदत अन्..; फडणवीसांनी घेतली दखल

नांदेड : नांदेड जिल्ह्यात सतत तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. आज पहाटेपासूनच नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सूरू झाला. मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला आहे. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून ‘एनडीआरएफ’ची टीम घटनास्थळी पोहोचत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसदृष्य पावसाची दखल घेतली आहे
पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशी दगावल्या आहेत.या म्हशींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्यानंतर अजूनही मेलेल्या म्हशी या पाण्यातच आहेत.मूक्रमाबाद गावात सध्या पुरजन्य परिस्थिती असून सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.दरम्यान 50 म्हशींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं पशु पालकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रावणगावात अनेकजण अडकले
मुखेड तालुक्यातील रावणगाव येथे ‘एसडीआरएफ’ची टीम दखल झाली आहे. गावात अनेक लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या गावात बचाव कार्य वेगाने सूरू करण्यात आलं आहे. गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हाकाकार माजवलाय त्यामुळे जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून लोक अडकलेल्या ठिकाणी बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं आहे.
महिलांना वाचवले
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ येथील अडकलेल्या महिलांना ‘एसडीआर’च्या टीमने बाहेर काढलं आहे. अडकलेल्या नागरीकांना पाण्याबाहेर काढण्याचे पूर्ण प्रयत्न सुरू झाले आहेत. बाहेर आलेल्या महिलांनी एकच आक्रोश केला आहे. अजून या गावात बचावकार्य सूरू आहे. हसनाळ आणि रावणगाव पाण्यात बुडाले असून अनेक गावकरी पाण्यात अडकले आहेत. बचावकार्य अजूनही सूरू आहे
सैन्याची मदत घेण्यात आली
नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधील तीन गावात शंभराहून अधिक लोक पाण्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या नागरिकांना पाण्याबाहेर काढण्यासाठी सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरहून सैन्य दलाची तुकडी निघाल्याची प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाचा अलर्ट असल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणुन सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं आहे. मुखेड तालुक्यातील हसनाळ , रावणगाव, भासवाडी येथे लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. पहाटे ढगफुटी सारखा पाऊस आणि लेंडी प्रकल्पाचे पाणी गावात शिरल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन नांदेडमधील पावसावर आणि पूरपरिस्थितीवर आपली नजर असल्याचं सांगितलं आहे. “नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीने लेंडी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. काल येथे झालेला पाऊस सुमारे 206 मि.मी. इतका होता. त्यामुळे रावनगाव, भासवाडी, भिंगेली, हासनाळ येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. रावनगाव येथे 225 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यापैकी अत्यंत प्रतिकूल असलेल्या ठिकाणाहून नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
तसेच, “हसनाळ येथे 8 नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. भासवाडी येथे 20 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. भिंगेली येथे 40 नागरिक अडकले असून, ते सुरक्षित आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. मी स्वत: नांदेड जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात असून, नांदेड, लातूर आणि बिदर असे तिन्ही जिल्हाधिकारी एकमेकांशी संपर्कात राहून बचाव कार्य करीत आहेत,” असंही फडणवीस म्हणालेत. त्याचबरोबर, “एनडीआरएफचा एक चमू, एक लष्करी पथक आणि पोलिसांची चमू समन्वयातून बचाव कार्य करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून सैन्याची एक तुकडी सुद्धा रवाना झाली आहे. स्थानिक प्रशासनाला सातत्याने प्रभावित भागात राहून समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे,” असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
24 वर्षानंतर दिसला धबधबा
नांदेड जिल्ह्यात सतत तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. तसेच इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने पैनगंगा नदी पूर आला आहे. त्यामुळे या नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याचे विशाल रूप तब्बल 24 वर्षानंतर आज समोर आलं आहे. धबधब्याचे या अजस्त्र रुपाला पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. धबधब्याचे असेच विशाल रूप 2006 साली झालेल्या महापुरात पहायला मिळाले होते. त्यानंतर आता थेट 24 वर्षांनंतर हे दृश्य पहायला मिळत आहे .
जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी, “जिल्ह्यात सध्या पाण्याने वेढलेल्यांना नागरीकांना सोडवण्याचे काम सुरू असून उर्वरीत बचाव कार्य तातडीने पूर्ण करणार आहे,” अशी माहिती दिली आहे. जिल्ह्यात 200 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून याबाबत माहिती घेण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणालेत. पाण्यात अडकलेल्या लोकांना सर्व मदत देण्याचे आदेश देण्यात आले असून महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नागरिकांना केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात काय घडलं आहे?
मुखेड तालुक्यात 18 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून, अनेक नागरिक पाण्यात अडकले आहेत.
ढगफुटीसदृश पावसाचं कारण काय आहे?
लेंडी धरणाच्या पाण्याची पातळी वाढणे, लातूर, उदगीर आणि कर्नाटकातून येणारं मोठ्या प्रमाणातील पाणी आणि कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 206 मिमी पाऊस पडल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांचाही यावर परिणाम झाला आहे.
कोणत्या गावांमध्ये लोक पाण्यात अडकले आहेत?
रावणगाव (225 नागरिक), भासवाडी (20 नागरिक), भिंगोली (40 नागरिक) आणि हसनाळ (8 नागरिक) येथे लोक पाण्यात अडकले आहेत. 5 नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.



