BuldhanaLatest News

79 व्या स्वातंत्र्यदिनी मेहकरमध्ये ‘सी.ओ. हटाव, मेहकर बचाव’साठी टॉवरवर आंदोलन…

बुलढाणा – एका बाजूला देशभरात 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळील टॉवरवर चढून गजानन बोरकर यांनी ‘सी.ओ. हटाव – मेहकर बचाव’ असा नारा देत अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

गजानन बोरकर यांनी प्रशासनाविरुद्ध अनेक मागण्यांसाठी आवाज उठवला आहे. यात प्रामुख्याने मेहकर शहरातील रस्त्यांची दुर्दशा, खराब नाली व्यवस्था, बेकायदेशीर अतिक्रमणांवर भेदभावपूर्ण कारवाई, आणि अनियंत्रित रेती वाहतूक या समस्यांचा समावेश आहे.

बोरकर यांनी विशेषतः रस्ता क्रमांक 548C (खंडाळा ते अजिस्पुर) वर नाले नसल्यामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे सांगितले. तसेच, पालखी मार्गावर पेवर ब्लॉक बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या सर्व मागण्यांसाठी त्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्मरणपत्र सादर केले होते. मात्र, प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी हे तीव्र पाऊल उचलले आहे.

बोरकर यांनी जर कोणत्याही अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर टॉवरवरून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी, तहसीलदार, एस.डी.ओ. आणि पोलीस प्रशासनाला या परिस्थितीसाठी त्यांनी जबाबदार धरले आहे.

या घटनेमुळे स्वातंत्र्यदिन आणि स्थानिक समस्यांचे आंदोलन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी समोर आल्याने मेहकरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील घडामोडींवर सिटी न्यूज लक्ष ठेवून आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button