ऑपरेशन वाईप आऊट’ अंतर्गत अमरावतीमध्ये भव्य सायकल रॅली

अमरावती: अमरावती शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याच्या उद्देशाने अमरावती पोलीस आयुक्तालयाने आज ‘ऑपरेशन वाईप आऊट’ या मोहिमेअंतर्गत भव्य सायकल रॅलीचे आयोजन केले. या रॅलीत पोलीस अधिकारी आणि शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
या मोहिमेला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया आणि विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली पार पडली. यामध्ये सुमारे २५० तरुण-तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून ‘नशा मुक्त अमरावती’ चा निर्धार केला.
यावेळी सहभागी झालेल्या नागरिकांनी गांजा, एमडी आणि इतर अंमली पदार्थांना शहरातून हद्दपार करण्याचा संकल्प केला. या सायकल रॅलीने संपूर्ण शहरात जनजागृती केली आणि अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीस व नागरिक एकत्र असल्याचे दाखवून दिले.
पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना आवाहन केले की, अंमली पदार्थांच्या विरोधात ही केवळ पोलिसांची मोहीम नाही, तर संपूर्ण अमरावतीकरांची आहे. सर्वसामान्य जनतेच्या सहभागामुळेच ही मोहीम यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



