समस्येवर मात करत गृहिणी झाली उद्योजिका: ८ हजारातून उभारले २९ कोटींचे साम्राज्य

कृतिका कुमारन यांनी गृहिणीतून व्यावसायिक बनून एक मोठी यशोगाथा रचली आहे. त्यांनी आपल्या मुलीच्या त्वचेच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी घरगुती साबण बनवण्यास सुरुवात केली आणि हाच व्यवसाय आज कोट्यवधींची उलाढाल करत आहे. 2017 मध्ये केवळ 8,000-10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेल्या ‘ विल्व्ह ‘ या नैसर्गिक, ऑर्गेनिक आणि टिकाऊ पर्सनल केअर प्रोडक्ट्सच्या ब्रँडची कहाणी प्रेरणादायी आहे.कृतिका कुमारन यांच्या यशामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे.
समस्येवर उपाय शोधला
कोईम्बतूरच्या कृतिका कुमारन यांच्या मुलीला एक्झिमा, तर आईला अनेक वर्षांपासून त्वचेच्या गंभीर समस्या होत्या, त्यामुळे त्यांना अनेक औषधे घ्यावी लागत होती. आईच्या, मुलीच्या त्वचेच्या समस्या पाहून कृतिका नैसर्गिक आणि सुरक्षित पर्याय शोधू लागल्या.तामिळनाडूतील गोबिचेट्टीपलायम या कृषीप्रधान शहरात कृतिका यांचे बालपण गेले. कृतिका यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. युट्यूब व्हिडिओ पाहिले तसेच कॉस्मेटोलॉजीमध्ये डिप्लोमा करून त्यांनी आपले ज्ञान वाढवले. 2017 मध्ये त्यांनी बकरीचे दूध, ऑलिव्ह ऑईल आणि एरंडीचे तेल यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून साबण बनवण्यास सुरुवात केली.त्यांच्या पहिल्या बकरीच्या दुधाच्या साबणाने त्यांच्या मुलीच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसून आला.यामुळे घरच्या उत्पादनांवर त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला.
8 हजारातून सुरूवात
उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून कृतिकाने मार्च 2017 मध्ये आपल्या घराच्या किचनमधून ‘विल्व्ह’ ब्रँडची सुरुवात केली.हे नाव पवित्र ‘बिल्वम’ म्हणजे बेल पत्र या पानावरून घेण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडिया, विशेषत: फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपल्या उत्पादनांचा प्रचार केला. त्यांना लवकरच कोईम्बतूर आणि तामिळनाडूच्या इतर भागातून ऑर्डर्स मिळू लागल्या. सुरुवातीला केवळ 8,000-10,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून कृतिकाने क्लासिक बकरीच्या दुधाचे साबण, चारकोल साबण आणि गुलाब साबण यांसारखी विविध उत्पादने बनवण्यास सुरुवात केली. यात बकरीचे दूध हे मुख्य घटक राहिले.



