आईsss! रस्ता ओलांडणाऱ्या शिवमला ओम्नी व्हॅनची धडक, दूर फेकला अन्… नागपूरमधील धक्कादायक घटना

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील विरली परिसरात सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ओम्नी व्हॅनने रस्ता ओलांडत असलेल्या शिवम अण्णाजी आत्राम (वय ९, रा. खडकी, ता. नागभीड) या मुलाला जबर धडक दिली. अपघातानंतर व्हॅनचा चालक घटनास्थळावरून पळून गेला असून, उमरेड पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, शिवम वडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीत शिक्षण घेत होता. रविवारी सकाळी सुमारे १०.५० वाजता तो काही मित्रांसह वडेगाव-वेलसाखरा फाटा रस्त्यालगत असलेल्या एका बंगल्यासमोर खेळत होता. खेळता-खेळता शिवम रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना बोरगावकडून प्रचंड वेगात आलेल्या ओम्नी व्हॅनने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, शिवम रस्त्यावर दूर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला.
अपघात होताच परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत, गंभीर जखमी अवस्थेत शिवमला उमरेड ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अपघातामुळे आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
व्हॅन आणि चालकाचा शोध सुरू असून, पोलिसांनी अपघात स्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेत आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी भरधाव वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, अपघात प्रवण ठिकाणी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



