धामणगावातील सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू

धामणगाव रेल्वे : धामणगावातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (२९ जून) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, अनिल वहिले काही कामानिमित्त नागपूर येथे गेले होते. परतीच्या प्रवासात रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे पोलीसांनी घटनास्थळाची माहिती मिळताच तत्काळ दत्तापूर पोलिसांना संपर्क केला.
गुन्हा उघडकीस येताच रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ आधार कार्ड आणि वीजबिल सापडल्यामुळे ओळख पटली. मृत व्यक्तीचे नाव अनिल वहिले (पत्ता: पुष्करणा नगर, धामणगाव) असे असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी हलवला. घटनेची माहिती मिळताच वहिले यांच्या नातेवाईकांनी, मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली.
या घटनेमुळे धामणगाव शहरात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. अनिल वहिले हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते व त्यांच्या जाण्याने समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी रेल्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वाघमारे यांची टीम, तसेच दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, नवनाथ खेडकर, झटाले यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळ व्यवस्थापनात सामाजिक कार्यकर्ते सुभाष कुचेरिया यांनी देखील सहकार्य केले.



