अकोल्यात २५ मुक्या प्राण्यांना विष देऊन केले ठार! – धक्कादायक प्रकार, सीसीटीव्हीत कैद

अकोला : अकोल्यातून समोर आलेल्या एका संतापजनक प्रकारानं संपूर्ण शहराला हादरून टाकलं आहे. मुक्या प्राण्यांवर झालेल्या अमानुष क्रौर्याने माणुसकीला काळिमा फासला आहे. विषारी अन्न देऊन २५ हून अधिक कुत्र्यांचा बळी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.
अकोल्यातील गुडधी परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावरील मोकाट आणि काही पाळीव कुत्र्यांना फक्त भुंकत असल्याचं कारण देत, एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना विषारी अन्न दिलं. गेल्या २४ तासांत तब्बल २५ पेक्षा अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही प्राण्यांची अवस्था अजूनही गंभीर आहे.हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला असून, एक व्यक्ती खाण्यासाठी काहीतरी देताना आणि त्यानंतर प्राण्यांची स्थिती बिघडताना स्पष्ट दिसून येत आहे.स्थानिक नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संबंधित व्यक्तीचा शोध सुरूआहे. प्राण्यांवरील क्रौर्याचं हे भयावह रूप पाहता, शहरात संतापाची लाट उसळली आहे. NGO आणि प्राणीमित्र संघटनांनी यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.या घटनेमुळे मोकाट प्राण्यांच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या संवेदनशीलतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.हा केवळ गुन्हा नाही – ही माणुसकीची हत्या आहे!
ही घटना केवळ मुक्या प्राण्यांची हत्या नाही, तर आपल्या समाजातील संवेदना आणि जबाबदारीवर एक मोठा प्रश्नचिन्ह आहे.पोलिसांकडून या प्रकरणात काय जातात? आणि दोषी व्यक्तीला शिक्षा मिळते का? हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं आहे.



