AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

अमरावती कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर! पेट्रोल पंपासमोर कार जळाली; तरीही मनपा प्रशासन सुस्त

महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या प्रभागातच स्वच्छतेचा बोजवारा; कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या अन् रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

अमरावती : शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याचे दिसून येत आहे. इंदूरच्या धर्तीवर अमरावतीला स्वच्छ शहर बनविण्याचा संकल्प केला जात असताना दुसरीकडे उस्मानिया कम्पाउंड परिसरातील कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या, रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग आणि वाहनांच्या दुरुस्तीच्या नावाखाली झालेले अतिक्रमण यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या प्रभागातच स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे.

या परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न आता केवळ नागरिकांच्या आरोग्यापुरता मर्यादित राहिलेला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पेट्रोल पंपासमोरील परिसरात MH02BJ 3167 क्रमांकाची होंडा कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्राथमिक माहितीनुसार, परिसरातील कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीमुळे जवळ उभी असलेली कार जळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे. या घटनेमुळे परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिवाळीच्या काळातही अमरावती शहरातील तब्बल १७ ठिकाणी कचऱ्याच्या ढिगांना आग लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांमध्ये महावितरणचे डीपी तसेच काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती पुढे आली होती. वारंवार कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडत असतानाही अशा ठिकाणांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिका प्रशासन किती गंभीर आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उस्मानिया कम्पाउंड परिसरातील रस्त्यांची परिस्थितीही चिंताजनक आहे. सुमारे ३० फूट रुंदीचा रस्ता असतानाही वाहनांची अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरच सुरू असलेल्या वाहनांच्या दुरुस्तीच्या कामांमुळे प्रत्यक्ष वाहतुकीसाठी अवघी १५ फूट जागा उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे ब्रिजच्या पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर होत असल्याने येथील अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनण्याची शक्यता आहे.

रस्त्यांवरील अतिक्रमणासोबतच फुटपाथवरही विविध प्रकारचे अतिक्रमण झाल्याने पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी जागा उरलेली नाही. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नसल्याने काही ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत आहे. कचऱ्याचे ढीग वेळेवर उचलले जात नसतील, तर परिसरात दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही या परिसरातील अस्वच्छता आणि अतिक्रमणाचा प्रश्न समोर आला होता. संबंधित यंत्रणेकडून काही प्रमाणात कारवाई करण्यात आली असली, तरी काही महिन्यांतच परिस्थिती पुन्हा जैसे थे झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्वच्छता कंत्राटदाराच्या कामाची नियमित तपासणी होते का, कचरा संकलन आणि विल्हेवाटीचे नियोजन योग्य पद्धतीने केले जाते का, तसेच अतिक्रमण विभागाकडून सातत्याने कारवाई केली जाते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने या परिसरातील कचऱ्याचे ढीग तातडीने हटवावेत, नाल्यांची नियमित साफसफाई करावी आणि कचरा साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण विभागाने रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंग, वाहन दुरुस्तीची दुकाने आणि फुटपाथवरील अतिक्रमणावर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणीही होत आहे.

आता प्रश्न असा आहे की, दिवाळीत १७ ठिकाणी कचऱ्याला आग लागल्यानंतर आणि उस्मानिया कम्पाउंड परिसरात कार जळाल्याची घटना घडल्यानंतर तरी महानगरपालिका प्रशासनाला जाग येणार का? महापौरांच्या प्रभागातील या समस्यांची दखल घेऊन स्वच्छता आणि अतिक्रमण विभाग प्रत्यक्ष कारवाई करणार का? तसेच संबंधित कंत्राटदाराच्या कामाची तपासणी करून जबाबदारी निश्चित केली जाणार का?

अमरावतीला स्वच्छ शहर बनविण्यासाठी केवळ घोषणा आणि संकल्प पुरेसे नाहीत, तर त्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण कारवाई आवश्यक आहे. कचऱ्याच्या ढिगांना आग लागल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आग लागण्याची परिस्थितीच निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button