नागपूर : भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदिवासी बांधवांना शुभेच्छा

आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध; समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविण्यावर भर – एकनाथ शिंदे
नागपूर प्रतिनिधी : भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आणि आदिवासी जनजातीय गौरव दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. भगवान बिरसा मुंडा यांनी अवघ्या २५ व्या वर्षी देशासाठी बलिदान देत आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि उन्नतीसाठी संघर्ष केला. त्यांच्या त्यागाचे स्मरण केवळ जयंतीपुरते मर्यादित न ठेवता आदिवासी समाजाच्या जीवनात विकास आणि परिवर्तन घडवून आणणे गरजेचे असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा दिवस जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण देशभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. यंदा भगवान बिरसा मुंडा जयंती आणि आदिवासी जनजातीय गौरव दिन असा दुहेरी उत्सव साजरा होत असून, या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
भगवान बिरसा मुंडा यांना आदिवासी समाजाकडून देवतासमान मानले जाते. त्यांना ‘धरती आबा’ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्याबरोबरच आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना, आश्रमशाळा आणि विकासात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाज मुख्य प्रवाहात यावा आणि त्यांना विकासाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत, आदिवासी समाजाच्या सन्मान आणि प्रगतीसाठी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला.
BYTE : एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र



