पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रूपाली हॉटेल्सचे परवाने निलंबित; एफडीएची मोठी कारवाई

स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन; तपासणीत दोन्ही हॉटेल्समध्ये गंभीर त्रुटी उघड
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील एफसी रोडवरील खवय्यांच्या पसंतीची प्रसिद्ध हॉटेल्स वैशाली आणि रूपाली यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. १३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत स्वयंपाकघराची अस्वच्छता, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि अन्न हाताळणीतील त्रुटींसह अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या.
हॉटेल वैशालीमध्ये स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष
अन्न सुरक्षा अधिकारी अजिंक्य सुभाष उमाप यांनी केलेल्या तपासणीत हॉटेल वैशालीला स्वच्छतेसंदर्भात १०० पैकी केवळ ५८ गुण मिळाल्याचे समोर आले. स्वयंपाकघरात जागेची कमतरता आणि अन्नपदार्थ ठेवण्याची असुरक्षित व्यवस्था आढळली. कच्चा माल ठेवण्यासाठीचा फ्रीजर महिलांच्या स्वच्छतागृहाशेजारी, तर डोसा आणि उत्तप्पा तयार करण्याचा तवा पुरुषांच्या स्वच्छतागृहाशेजारी ठेवण्यात आला होता. धुतलेली भांडीही स्वच्छतागृहासमोरील टेबलावर ठेवलेली आढळली. याशिवाय शिजवलेला भात, उकडलेले बटाटे आणि इतर तयार खाद्यपदार्थ उघड्या कॉरिडॉरमध्ये ठेवण्यात आल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
विशेष म्हणजे, जून २०२६ मध्येही वैशाली हॉटेलची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरमधील तपासणीतही गंभीर त्रुटी कायम असल्याचे निदर्शनास आले.
रूपाली हॉटेलमध्येही अनेक त्रुटी
हॉटेल रूपालीचे स्वयंपाकघर उघडे आणि असुरक्षित असल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे धूळ, घाण आणि कीटकांचा अन्नपदार्थांशी संपर्क येण्याची शक्यता होती. परिसरात पाणी साचणे, अपुरी स्वच्छता आणि कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन अशा समस्याही निदर्शनास आल्या.
कच्चा माल, अर्धप्रक्रियायुक्त आणि तयार अन्नपदार्थ योग्य प्रकारे झाकून ठेवलेले नव्हते. काही पदार्थांवर आवश्यक लेबलिंग तसेच वापरण्याच्या अंतिम तारखेचा उल्लेख नव्हता. कच्चे आणि तयार अन्नपदार्थ स्वतंत्र न ठेवणे, तापमान नियंत्रणाच्या नोंदींचा अभाव, अन्न सुरक्षा व्यवस्थापन योजना आणि प्रमाणित कार्यपद्धतीची कागदपत्रे उपलब्ध नसणे, तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या नोंदी नसणे, अशा त्रुटीही तपासणीत समोर आल्या.
लेखी परवानगीनंतरच व्यवसाय सुरू करता येणार
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत एफडीएने दोन्ही हॉटेल्सचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर करून पुन्हा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री झाल्यानंतर आणि एफडीएकडून लेखी परवानगी मिळाल्यानंतरच व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार आहे. तोपर्यंत खाद्यपदार्थांची विक्री, पार्सल आणि होम डिलिव्हरी बंद राहणार आहे.
तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाच्या या कारवाईमुळे पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. प्रसिद्ध हॉटेल्समध्येही अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन आवश्यक असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



