खासदारांना रवी राणांचे खुले आव्हान; अडीच वर्षांच्या विकासकामांचा हिशेब जनतेला द्या!

मेळघाटात ‘खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा’चे फलक लागल्याचा राणांचा दावा; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मात्र विकासाचे महामेरू म्हणून कौतुक
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीच्या खासदारांच्या कार्यपद्धतीवरून आमदार रवी राणा यांनी जोरदार टीका केली आहे. खासदार निवडून येऊन अडीच वर्षांचा कालावधी उलटला, मात्र ते अद्याप जनतेच्या भेटीला येत नसल्याचा आरोप राणा यांनी केला. मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमध्ये ‘खासदार शोधा आणि बक्षीस मिळवा’ अशा आशयाचे फलक लागल्याचा दावा करत त्यांनी खासदारांच्या जनसंपर्कावर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
खासदारांनी निवडून आल्यानंतर अडीच वर्षांत नेमकी कोणती विकासकामे केली, याचा हिशेब जनतेसमोर मांडावा, असे खुले आव्हान रवी राणा यांनी दिले. केवळ आरोप-प्रत्यारोप न करता खासदारांनी समोर येऊन आपल्या कामांचा लेखाजोखा मांडावा. यासाठी त्यांनी एखाद्या चौकात येऊन विकासकामांची माहिती द्यावी, त्यासाठी तारीख आणि वेळ निश्चित करावी, असे थेट आव्हानही राणा यांनी दिले.
दरम्यान, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मात्र रवी राणा यांनी कौतुक केले. बावनकुळे यांचा उल्लेख विकासाचे महामेरू असा करत जिल्ह्यातील विकासकामांच्या अनुषंगाने त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.
रवी राणा यांच्या या विधानामुळे अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषतः खासदारांच्या कामकाजावर उपस्थित केलेले प्रश्न आणि मेळघाटातील फलकांबाबत केलेला दावा यामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. आता रवी राणा यांच्या आरोपांना अमरावतीचे खासदार काय प्रत्युत्तर देतात आणि अडीच वर्षांच्या कामांचा लेखाजोखा कधी मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



