वाशिममध्ये बैलांची निर्दयी वाहतूक; आठ बैलांची सुटका, दोन वाहने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कळंबा फाट्यावर कारवाई; १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त
वाशिम | प्रतिनिधी
पाळीव बैलांची अवैधरित्या आणि निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्यांविरोधात वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. मंगरुळपीर-वाशिम मार्गावरील कळंबा फाटा परिसरात केलेल्या या कारवाईत दोन मालवाहू वाहनांमधून कोंबून नेण्यात येणाऱ्या आठ बैलांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही वाहनांसह एकूण १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरून दोन्ही मालवाहू वाहनांची तपासणी केली असता, त्यामध्ये आठ बैल अत्यंत दाटीवाटीने आणि निर्दयीपणे कोंबून ठेवल्याचे आढळले. वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे बैलांची सुटका करून पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली.
या प्रकरणी फैजान मोहम्मद आणि जावेद अहमद या दोघांविरोधात आसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांची अवैध आणि निर्दयी वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू आहे.



