citynewsWashim

वाशिममध्ये कांदा ७०, तर लसूण २५० रुपये किलो; भाजीपाल्याच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

पाणीटंचाईमुळे उत्पादनात घट; बाजारातील आवक कमी झाल्याने दरात १० ते २० टक्क्यांची वाढ

वाशिम | प्रतिनिधी

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाईचा परिणाम आता भाजीपाल्याच्या उत्पादनावर आणि बाजारातील दरांवरही दिसू लागला आहे. पाण्याअभावी भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने वाशिमच्या घाऊक बाजारपेठेत आवक कमी झाली आहे. परिणामी, घाऊक व्यापाऱ्यांना इतर जिल्ह्यांतून भाजीपाला खरेदी करून आणावा लागत असून, त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील किमतींवर झाला आहे. कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे घरगुती बजेट कोलमडले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी ४० रुपये किलो दराने मिळणारा कांदा आता ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे. तर १८० ते १९० रुपये किलो असलेल्या लसणाचे दर वाढून २४० ते २५० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय इतर भाजीपाल्याच्या दरातही सुमारे १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

स्थानिक बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटल्याने बाहेरील जिल्ह्यांतून माल मागवण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. वाहतूक आणि खरेदी खर्चाचा परिणामही बाजारभावावर होत असल्याचे चित्र आहे. आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आता भाजीपाल्याच्या दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणारा भाजीपाला खरेदी करतानाही सर्वसामान्यांना खर्चाचा विचार करावा लागत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button