शेतकऱ्यांच्या शेतात चोरट्यांचा हैदोस! दोन दिवसांत दोन चोऱ्या; मोटर पंपासह सोलर पंपाच्या बॅटरीवर चोरट्यांचा डल्ला

साकोली तालुक्यातील शिवनीबांध परिसरात चोरीच्या घटनांनी शेतकरी त्रस्त; शेती करण्यापेक्षा शेतातील साहित्याची राखण करण्याची वेळ, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
साकोली (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात चोरट्यांनी शेतशिवाराला लक्ष्य केले असून, शिवनीबांध परिसरात अवघ्या दोन दिवसांत चोरीच्या दोन घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतातील मोटर पंप, शेती उपयोगी साहित्य आणि सोलर पंपाच्या बॅटरीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दिवसा शेतात राबायचे आणि रात्री चोरीच्या भीतीने शेतातील साहित्याची राखण करायची, अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

शिवनीबांध येथील शेतकरी विनायक जांभुळकर यांच्या शेतातील मोटर पंप आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या चोरीमध्ये अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर संबंधित शेतकऱ्याने साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांत तक्रार दाखल होऊन एक दिवस उलटत नाही तोच शेतशिवारात चोरीची दुसरी घटना घडली.

दुसऱ्याच दिवशी अज्ञात चोरट्यांनी शेतातील सोलर पंपाची बॅटरी चोरून नेली. सलग दोन दिवसांत दोन चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. शेतीसाठी मोठा खर्च करून बसवलेले मोटर पंप आणि सोलर पंपाचे साहित्य चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितही बिघडण्याची शक्यता आहे.

शेती करायची की शेताची राखण करायची?
आधीच शेतीचा वाढता खर्च, पिकांची चिंता आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसभर शेतात मेहनत केल्यानंतर रात्रीही चोरट्यांपासून साहित्य वाचवण्यासाठी जागता पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतशिवारात नियमित पोलीस गस्त नसल्याचा प्रश्नही या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.
पोलीस प्रशासनाने गस्त वाढवण्याची मागणी
शिवनीबांध परिसरातील सलग चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी चोरट्यांचा शोध घ्यावा, चोरीला गेलेले साहित्य परत मिळवून द्यावे आणि शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वारंवार अशा घटना घडत राहिल्यास शेतीसाठी उभारलेली साधनसामग्री सुरक्षित कशी ठेवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
एकीकडे शेतकरी शेतात घाम गाळून अन्नधान्य पिकवतो, तर दुसरीकडे त्याच्याच कष्टाच्या साधनसामग्रीवर चोरटे डल्ला मारत आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीपेक्षा शेताची राखण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागणार का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सिटी न्यूजसाठी | सुधीर शिवणकर, भंडारा



