इंस्टाग्राम स्टोरीवरील जुन्या वादातून पिता-पुत्राला बेदम मारहाण; वडिलांचा मृत्यू!

बुलढाण्यातील भालेगावची धक्कादायक घटना; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १५ संशयित मेहकर पोलिसांच्या ताब्यात
मेहकर (गजानन राऊत) : सोशल मीडियावरील जुन्या पोस्टच्या वादातून झालेल्या मारहाणीत एका पित्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथे घडली आहे. इंस्टाग्रामवरील स्टोरीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. यामध्ये नीलेश अशोकराव निकम यांचा मृत्यू झाला असून त्यांचा १६ वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १५ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे छायाचित्र असलेल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून २ ऑक्टोबर रोजी या वादाला सुरुवात झाली होती. दुसऱ्या दिवशी एका तरुणाने संबंधित मुलाला फोन करून जाब विचारला. त्यावेळी मुलाने माफी मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मुलाच्या नातेवाइकांनीही मेहकर येथे काही तरुणांची भेट घेऊन त्याच्या वतीने माफी मागत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.

पुन्हा माफी मागण्याचा आग्रह; पिता-पुत्राला मारहाण
मात्र, हा वाद मिटलेला नसल्याचे मंगळवारी पुन्हा घडलेल्या घटनेवरून दिसून आले. सायंकाळी सहाच्या सुमारास नीलेश निकम हे शेतातून घरी परतत असताना काही तरुण दुचाकीवरून त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी निकम यांच्या मुलाला पुन्हा माफी मागण्यास सांगितले. त्यानंतर पिता-पुत्राला बैठकीसाठी बोलावून २० ते २५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
यावेळी मुलगा माफी मागत असतानाच जमावातील काही जणांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वडिलांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना मारू नका, अशी विनंती मुलाने केली. मात्र, याचदरम्यान नीलेश निकम हे बेशुद्ध पडले. तसेच माफी मागतानाचे चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप मुलाने केला आहे.
रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी केले मृत घोषित
घटनेनंतर नातेवाइकांनी नीलेश निकम यांना तातडीने मेहकर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेत त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. वडिलांच्या मृत्यूस मारहाण करणारेच जबाबदार असल्याचा आरोप मुलाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे.
२० जणांविरुद्ध गुन्हा; १५ जण पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी १५ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मीडियावरील एका जुन्या पोस्टचा वाद थेट जीवघेण्या संघर्षापर्यंत पोहोचल्याने भालेगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, नीलेश निकम यांच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारहाणीचा मृत्यूशी असलेला संबंध, तसेच घटनेत सहभागी असलेल्या प्रत्येक संशयिताची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
सिटी न्यूज | गजानन राऊत, मेहकर (बुलढाणा)



