शहर स्वच्छ ठेवणाऱ्या हातांसोबत नगरसेवक दीपक साहू सम्राट यांची दिवाळी; ८० सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान!

दिवाळीचे रंग, सफाई कामगारांसोबत’ उपक्रमातून फराळ, मिठाई आणि भेटवस्तूंचे वाटप; उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
अमरावती : संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वर्षभर मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरही दिवाळीचा आनंद फुलावा, या संवेदनशील भावनेतून मोरबाग प्रभागाचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य दीपक साहू सम्राट यांनी अनोखा उपक्रम राबविला. ‘दिवाळीचे रंग, सफाई कामगारांसोबत’ या संकल्पनेतून मसानगंज येथील बजरंग टेकडी मंदिरात सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुमारे ८० महिला व पुरुष सफाई कर्मचाऱ्यांचा फराळ, मिठाई आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

मोरबाग, विलासनगर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कर्मचारी दररोज पहाटेपासून आपले कर्तव्य बजावत असतात. नागरिकांना स्वच्छ वातावरण आणि आरोग्यदायी परिसर मिळावा, यासाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता हे कर्मचारी सातत्याने मेहनत घेतात. त्यांच्या या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने बुधवारी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रभागातील सुमारे ८० महिला व पुरुष सफाई कर्मचारी, सुपरवायझर, बिडप्यून, वाहनचालक आणि त्यांचे सहाय्यक यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. नगरसेवक दीपक साहू सम्राट यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्याप्रती आभार व्यक्त केले. दिवाळीनिमित्त प्रत्येकाला फराळ, मिठाई आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्वांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, नगरसेवकांनी स्वतः सफाई कर्मचाऱ्यांसोबत भोजनाचा आनंद घेतला.
या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नानाभाऊ आमले, युवा स्वाभिमान पक्षाचे सुनील भाऊ राणा, अमरावती युवा स्वाभिमान शहर उपाध्यक्ष महेश किल्लेकर, शहर उपाध्यक्ष निखिल मंत्री, रवि भाऊ अडोकार, संतोष साहू आटेवाले, निर्मल अहिरवार, माजी एपीएमसी संचालक विनोद गुहे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर सचिन भेंडे, गटनेते नानाभाऊ आमले आणि सुनील भाऊ राणा यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच दीपक साहू सम्राट यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना शहराच्या स्वच्छतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा आणि युवा स्वाभिमान परिवार नेहमीच सफाई कामगारांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाला रवि साहू सम्राट, जतिन यादव, किशोर गुप्ता, धिन्नू महाराज तिवारी, सुरेश गुप्ता, मुन्ना दीपक साहू तेलवाले, राजू राय, राजू भाऊ डीकयाव, त्रिदेव डेंडवाल, विशाल गुप्ता, पंकज नंदकिशोर साहू, सुमित मातोले, मेघराज, बोनी भैया डेंडवाल, सूरज बोयत, संजय बोयत, मयूर सारसर, आकाश भैया, अजय तायडे, अमित निकालजे, निकेश खुरखुरिया, संकेत तायवाडे, सुनील चौहान, जय जामनीक, कैलाश चावरे, अशोक इंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
महिला सफाई कर्मचाऱ्यांमध्ये दुर्गाबाई ढोलकर, मालतीबाई गोहर, रीनाबाई चावरे, आशाबाई सोनटके, बबिताबाई सारसर, राधाबाई चावरे आणि सीमाबाई काकडे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज बसेरिया यांनी केले. स्नेहभोजन आणि भेटवस्तू वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वर्षभर राबणाऱ्या हातांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडविणारा ठरला. दिवाळीचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजासाठी मेहनत करणाऱ्या घटकांसोबत साजरा करण्याचा दीपक साहू सम्राट यांचा प्रयत्न उपस्थितांसाठी विशेष ठरला.



