BuldhanacitynewsFarmersCrisis

बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी राजकीय संघर्ष पेटला!

पेनटाकळी धरणावर आमदार सिद्धार्थ खरात यांचा हजारो शेतकऱ्यांसह मोर्चा; पाणी सोडण्याची मागणी, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

बुलढाणा : पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. सोयाबीनचे पीक करपून गेल्यानंतर आता तूर, कपाशी आणि हळद या पिकांवरही पाणीटंचाईचा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत पेनटाकळी प्रकल्पातील पाणी सिंचनासाठी सोडण्याच्या मागणीवरून जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी पेनटाकळी धरणावर मोर्चा काढला.

पेनटाकळी प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध असतानाही शेतीसाठी पाणी सोडले जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी धरणातील शिल्लक पाणी तातडीने सिंचनासाठी सोडावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

‘पाणी सोडा, अन्यथा आम्ही स्वतः सोडू’

आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, धरणातील पाणी शेतकऱ्यांसाठी सोडावे, अन्यथा शेतकरी आणि पदाधिकारी स्वतः धरणातून पाणी सोडतील, अशी भूमिका मांडली. पाण्याच्या प्रश्नावर राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांनी मोर्चा अडवला

आमदार खरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पेनटाकळी फाट्यावर पोलिसांनी अडवला. यानंतर घटनास्थळी प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी दाखल झाले. यामध्ये एसडीओ राजेंद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके, एसडीपीओ संतोष खाडे तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दोन दिवसांत संनियंत्रण समितीची बैठक

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या दोन दिवसांत संनियंत्रण समितीची बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून आंदोलकांना देण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी ठाकरे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता संनियंत्रण समितीच्या बैठकीत पाणी सोडण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button