AMCActionAmravaticitynews

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ नोव्हेंबरला अमरावतीत विशेष नोंदणी शिबिर!

महानगरपालिका व ALIMCOचा संयुक्त उपक्रम; व्हीलचेअर, कर्णयंत्र, स्मार्टफोनसह विविध साहित्य मिळणार; पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन

अमरावती | प्रतिनिधी

दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अमरावती महानगरपालिका आणि भारतीय कृत्रिम अवयव निर्माण महामंडळ (ALIMCO), कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष नोंदणी व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रुक्मिणी नगर येथील महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १९ येथे हे शिबिर पार पडणार आहे. शहरातील पात्र दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यभूत साहित्य

या शिबिरात दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार लाभार्थ्यांची तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे. अस्थिव्यंग प्रवर्गातील किमान ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना व्हीलचेअर, काठी, कुबडी आणि सी.पी. चेअर यांसारखे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी सायकलसाठी किमान ८० टक्के दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी संबंधित पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

१०० टक्के अंधत्व असलेल्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांना ब्रेल किट आणि अंध काठी देण्यात येणार आहे. इयत्ता दहावीपासून पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्टफोन आणि सेन्सरयुक्त अंध काठीची सुविधा उपलब्ध आहे. यासाठी शाळा किंवा महाविद्यालयाचे ओळखपत्र अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

कर्णबधिर प्रवर्गातील किमान ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना कर्णयंत्र, तर किमान ४० टक्के बौद्धिक अक्षमता असलेल्या लाभार्थ्यांना टीएलएम (TLM) किट देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ६० वर्षे व त्यावरील पात्र नागरिकांची नोंदणी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रांनुसार मासिक उत्पन्न १६ हजार रुपये किंवा वार्षिक उत्पन्न १ लाख ८० हजार रुपये असणे आवश्यक आहे. मागील तीन वर्षांत या योजनेअंतर्गत साहित्याचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर, कमोडसह व्हीलचेअर, चालण्यासाठी काठ्या, कानाचे यंत्र, कमरेचे व गुडघ्याचे पट्टे, गुडघ्याचे पॅड, बसण्यासाठी गादी आणि कमोड चेअर आदी सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे

दिव्यांग व्यक्तींनी नोंदणीसाठी UDID कार्ड (आवश्यक), दिव्यांगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड सोबत आणावे. उत्पन्नाची अट मासिक २२ हजार ५०० रुपये किंवा वार्षिक २ लाख ४० हजार रुपये अशी आहे. या कागदपत्रांच्या आधारेच लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

तसेच मागील तीन वर्षांत कोणत्याही प्रकारच्या सहाय्यभूत साहित्याचा लाभ घेतलेला नसावा. बॅटरी ऑपरेटेड तीनचाकी सायकल आणि स्मार्टफोनसाठी मागील पाच वर्षांत लाभ घेतलेला नसणे आवश्यक आहे.

नोंदणीनंतर पुढील शिबिरात साहित्य वाटप

या उपक्रमांतर्गत ३ नोव्हेंबर रोजी पात्र लाभार्थ्यांची तपासणी व नोंदणी करण्यात येणार आहे. तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार पुढील शिबिरात सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींसह निर्धारित वेळेत उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी.

दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुलभ व्हावे, त्यांना दैनंदिन व्यवहारात स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button