AmravatiCity CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत होणाऱ्या पती-पत्नीवर चाकूने हल्ला; तरुणीच्या मांडीवर, तर तरुणाच्या कपाळावर वार

राजापेठेतील सावल्या हॉटेलजवळील घटना; दोघे जखमी, राजापेठ पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती शहरातील राजापेठ परिसरात अंबादेवीचे दर्शन घेऊन दुचाकीने परतणाऱ्या तरुणी आणि तिच्या होणाऱ्या पतीवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास सावल्या हॉटेलजवळ हा प्रकार घडला. या हल्ल्यात अंजली सुंदरकर आणि मयूर जामोदकर हे दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी आडवी लावून अडविले

राजापेठ पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, अंजली सुंदरकर आणि तिचा होणारा पती मयूर जामोदकर हे दोघे अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना सावल्या हॉटेलजवळ धीरज जामोदकर हा अन्य एका व्यक्तीसह दुचाकीवरून तेथे आला. त्याने दोघांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावून त्यांना अडविले.

त्यानंतर, तिच्यासोबत कुठे चालला आहे, असे म्हणत आरोपीने अंजलीवर चाकूने वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा वार तिच्या डाव्या मांडीवर लागला.

मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावरही वार

अंजलीला वाचविण्यासाठी मयूर पुढे आला असता आरोपीने त्याच्यावरही चाकूने हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या हल्ल्यात मयूरच्या कपाळावर आणि डाव्या हातावर दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पळून गेल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.

राजापेठ पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी फिर्यादी मनीष सुंदरकर यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२६(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये धीरज गोविंदराव जामोदकर आणि एका अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.

या घटनेचा पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळी सध्या शांतता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही.

सिटी न्यूज | अमरावती

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button