citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात प्रतिबंधित गुटख्यावर पोलिसांची मोठी कारवाई; १ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त

लकडगंज पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित पानमसाला, गुटखा आणि सिगारेटसह रोख रक्कम जप्त

नागपूर : नागपूर शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथकाने केलेल्या कारवाईत प्रतिबंधित महाराष्ट्र राज्य पानमसाला आणि गुटख्यासह सिगारेट आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास एस्कॉर्ट पथक प्रमुख एपीआय भगवान कोळी हे पथकासह शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी संतनामी नगर चौक परिसरातील हिरापान पॅलेस येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या पान मसाला, गुटखा तसेच प्रतिबंधित सिगारेटची चोरीछुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खात्री झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भगवान कोळी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी लकडगंज पोलीस ठाण्याचे राजपत्रित अधिकारी मपोउपनि सोनल शिंदे यांना दोन पंचांसह बोलावून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.

या कारवाईदरम्यान ८९ हजार ८४६ रुपये किमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिबंधित सुगंधित पानमसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये विमल, राजश्री, पान पराग, बाबा नवरत्न आणि रजनीगंधा यांसारख्या पानमसाल्याचे लहान-मोठे पुडे आढळून आले.

याशिवाय प्रतिबंधित सिगारेट आणि १६ हजार ६३० रुपये रोख रक्कम असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १ लाख ६ हजार ४७६ रुपयांचा मुद्देमाल कारवाईत ताब्यात घेतला.

या प्रकरणात बादल मोतीलाल कोटके, वय २५ वर्षे, रा. भरतवाडा, पुनापूर, पारडी, नागपूर याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथक प्रमुख एपीआय भगवान कोळी, मपोउपनि सोनल शिंदे, पोहेकॉ/अनुप लोलसरे, आशीष पायघने, अर्शद शेख, दिनेश क्षीरसागर, सोनू सोनवणे आणि चंद्रकांत मेहत्रे यांनी केली.

प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास लकडगंज पोलीस करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button