चोरीचे सोने गहाण ठेवणारी महिला अटकेत; दोन गुन्ह्यांचा उलगडा

वर्धा शहरातील दोन सर्राफा दुकानांतून सोन्याची चोरी; CCTV आणि तांत्रिक तपासाच्या आधारे LCBची कारवाई
वर्धा : वर्धा शहरातील दोन सर्राफा दुकानांमध्ये चलाखीने सोने चोरी केल्याच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला आहे. चोरीचे सोने सर्राफा दुकानात गहाण ठेवणाऱ्या २९ वर्षीय महिलेला हिंगणघाट येथून अटक करण्यात आली आहे. शेख रूमाना उर्फ शबाना उर्फ मुस्कान शेख आरिफ, रा. संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट, असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
वर्धा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित महिलेचा माग काढला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे LCB पथकाने हिंगणघाट येथे कारवाई करत महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची चौकशी केली असता, चोरी केलेले सोने हिंगणघाट येथील सर्राफा दुकानांमध्ये गहाण ठेवल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.
चोरीचे सोने गहाण ठेवताना मुलगी आजारी असल्याचे कारण सांगितल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेच्या ताब्यातून १.६३० ग्रॅम आणि २.६२० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे टॉप्स जप्त केले आहेत. या सोन्याची एकूण किंमत ५९ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईमुळे वर्धा शहरातील दाखल असलेल्या दोन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वर्धा शहर पोलीस करीत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे :
- २९ वर्षीय महिला LCBच्या ताब्यात
- वर्धा शहरातील दोन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा
- CCTV आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई
- चोरीचे सोने हिंगणघाटमध्ये गहाण ठेवल्याचे तपासात समोर
- ५९ हजार ६०० रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त



