नागपुरात घरफोडी-वाहन चोरीचा छडा; ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

दोन आरोपी ताब्यात; एक घरफोडी आणि तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस
नागपुरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पियुष रवींद्र जगनाडे, वय २२ वर्षे आणि श्रीकांत धनीराम चांदेवार, वय २१ वर्षे या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत अजनी, हिंगणा, सीताबर्डी आणि मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक घरफोडी आणि तीन मोटारसायकल चोरीचे, असे एकूण चार गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींकडून १५ ग्रॅम वजनाची सोन्याची गोफ, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील रिंग, एक अॅक्टिव्हा मोपेड, एक हिरो होंडा पॅशन प्रो, एक पल्सर एनएस १६० आणि दोन मोबाईल असा एकूण सुमारे ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका सोनाराचाही या प्रकरणात समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना तसेच संबंधित सोनाराला पुढील कायदेशीर कारवाईसाठी अजनी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.



