citynewsNagpurNagpurCrime

नागपुरात दुचाकी चोरट्यांचा छडा; सहा दुचाकी जप्त

गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ची कारवाई; २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नागपुरात दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ने छडा लावला आहे. जरीपटका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २ लाख ९० हजार रुपये असल्याची माहिती आहे.

जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स जिओ मार्ट येथे पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीने आपली मॅट ब्ल्यू रंगाची सुझुकी अॅक्सेस १२५ दुचाकी क्रमांक MH 49 CG 6249 पार्क केली होती. काही वेळानंतर ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. याप्रकरणी जरीपटका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३२/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५कडून समांतर तपास सुरू असताना दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या ताब्यातून जरीपटका गुन्ह्यातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीची सुझुकी अॅक्सेस १२५ जप्त करण्यात आली. यासोबतच मध्य प्रदेशातील सिवनी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पॅशन एक्सप्रो दुचाकीसह आणखी चार दुचाकी असा एकूण सहा दुचाकींचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, जप्त केलेल्या दुचाकींच्या माध्यमातून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button