citynewsNanded

माहूरमध्ये श्री रेणुकादेवी संस्थानचे भव्य मोफत आरोग्य शिबिर

हजारो रुग्णांनी घेतला लाभ; तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे श्री रेणुकादेवी संस्थान आणि सहधर्मादाय आयुक्त कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ अंतर्गत भव्य मोफत रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित या शिबिरात विविध आजारांनी त्रस्त हजारो रुग्णांनी तपासणी व उपचाराचा लाभ घेतला.

‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन नांदेड धर्मादाय सहआयुक्त तथा श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षा हिरा शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी दीपप्रज्वलन, श्री रेणुकामातेच्या प्रतिमेचे पूजन तसेच गणरायाचे पूजन करण्यात आले. आमदार भीमराव केराम, सहाय्यक धर्मादाय आयुक्त संजय यादव, धर्मादाय उपायुक्त ममता राकडे, तहसीलदार अभिजीत जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्यासह संस्थानचे विश्वस्त व अधिकारी उपस्थित होते.

गोरगरीब आणि गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे हिरा शेळके यांनी सांगितले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी, यासाठी शिबिरात विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक उपचार तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

दरम्यान, भविष्यातही संस्थानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दर महिन्याला नेत्र तपासणी शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांना मोफत चष्मे देण्याची घोषणाही करण्यात आली.

शिबिरासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी श्री रेणुकादेवी संस्थानच्या वतीने भोजन तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आरोग्यसेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button