
२०० जिल्ह्यांमध्ये परीक्षा; महाभारत, गीता, रामायणासह विविध धर्मांच्या आध्यात्मिक विचारांवर आधारित प्रश्न
अमरावती : आध्यात्मिक ज्ञान आणि नैतिक मूल्ये परीक्षेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आयएसओ कौन्सिलच्या वतीने देशभरातील तब्बल २०० जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक ऑलंपियाड परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना विविध धर्मांच्या आध्यात्मिक विचारांची ओळख करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या परीक्षेत महाभारत, भगवद्गीता आणि रामायण यांसह बौद्ध, शीख, ख्रिश्चन तसेच विविध धर्मांच्या आध्यात्मिक आणि नैतिक विचारांवर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना विविध धर्मांच्या शिकवणी, मूल्ये आणि आध्यात्मिक विचारांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.
विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत देशभरात तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया यांच्या निवासस्थानी आयएसओ कौन्सिलच्या टीमचे स्वागत करण्यात आले. यावेळी टीमच्या सदस्यांनी आगामी परीक्षेची संपूर्ण माहिती उपस्थितांना दिली.
आध्यात्मिक ज्ञानासोबतच विविध धर्मांच्या विचारांची ओळख आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आता आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक ऑलंपियाडला देशभरातून किती प्रतिसाद मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.



