
५० गणेश मंडळांचे पोलिसांना निवेदन; नियमांचे पालन करण्याची प्रशासनाची भूमिका, मंडळांकडून विसर्जनाबाबत इशारा
अचलपूर : शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि पारंपरिक वाद्यांच्या परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील तब्बल ५० गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही वाद्यांना परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, पोलिस प्रशासनाने न्यायालयीन आदेश आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पूर्णतः पालन केले जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आवाजाबाबतचे नियम कायम ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या २०२२ मधील निर्णयानुसार डीजे व वाद्यांना परवानगी देण्याची प्रक्रिया स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यासंदर्भात मंडळांच्या प्रतिनिधींनी पोलिस प्रशासनाला निवेदनही दिले.
दरम्यान, नियमबाह्य कोणतीही परवानगी दिली जाणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने स्पष्ट केली. त्यामुळे मंडळांच्या मागण्या आणि प्रशासनाची नियमपालनाची भूमिका यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत.
पोलिस प्रशासनाच्या भूमिकेनंतर काही गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली असून, डीजे आणि वाद्यांच्या परवानगीचा प्रश्न मार्गी न लागल्यास गणेश विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावर प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
अचलपूरमधील गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे पालन करून पार पडावा, यासाठी प्रशासनाकडून कोणता निर्णय घेतला जातो, तसेच गणेश मंडळांच्या मागण्यांवर तोडगा निघतो का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.



