Uncategorized

बडनेरा पोलिसांचा ‘तडीपार’ आरोपींवर वॉच; ५९ आरोपींचे फोटो शहरभर झळकले

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची विशेष खबरदारी; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

बडनेरा : गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि ईदसारखे सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत, यासाठी बडनेरा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले असून, शहरातील प्रमुख चौक आणि सार्वजनिक ठिकाणी तडीपार करण्यात आलेल्या ५९ आरोपींचे छायाचित्रांसह फलक लावण्यात आले आहेत.समता चौक, बडनेरा पोलीस ठाण्यासमोरील परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून होली क्रॉसकडे जाणाऱ्या मार्गावर हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर संबंधित आरोपींचे छायाचित्र आणि आवश्यक माहिती देण्यात आली आहे.तडीपार करण्यात आलेला कोणताही आरोपी शहरात दिसल्यास किंवा त्याने प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनमंत ऊरलागोंडावार आणि पोलीस निरीक्षक निलेश करे यांनी एसआरपी पथकासोबत शहरातील प्रमुख मार्गांवर रूट मार्च केला. यावेळी पोलिसांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेत या फलकांचीही पाहणी केली.या उपक्रमामुळे तडीपार आरोपींची ओळख नागरिकांना सहज पटवता येणार असून, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांना माहिती देणे अधिक सोपे होणार आहे. सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बडनेरा पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button