citynewsCrime NewsDharniMaharashtra

अवैध रेती तस्करीविरोधात आवाज उठवणाऱ्या पेसा आंदोलकाला नोटीस

भविष्यात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे कारण; गंगाराम जांभेकर यांचा दावा

धारणी : मेळघाटातील पेसा क्षेत्रात सुरू असलेल्या कथित अवैध रेती तस्करीसह विविध अवैध व्यवसायांविरोधात आवाज उठवणारे पेसा आंदोलक गंगाराम जांभेकर यांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भविष्यात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे कारण देत ही नोटीस देण्यात आल्याचे जांभेकर यांनी म्हटले आहे.

मेळघाटातील पेसा क्षेत्रात मागील अनेक दिवसांपासून अवैधरित्या रेती तस्करी सुरू असल्याचा आरोप जांभेकर यांनी केला आहे. काही कथित रेती तस्करांना पकडून त्याबाबत पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

यानंतर तहसील कार्यालय धारणी अंतर्गत पोलीस स्टेशन धारणीमार्फत आपल्याला कलम 126 आणि 135 अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्याचा दावा जांभेकर यांनी केला आहे. भविष्यात शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे कारण नोटिशीत नमूद करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रेती तस्करीसोबतच मेळघाटात कथित अवैध दारू, गुटखा, गांजा विक्री तसेच इतर अवैध प्रकारांविरोधातही आपण आवाज उठवत असल्याचे जांभेकर यांनी सांगितले. जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण तसेच पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी आपला संघर्ष सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाकडून नोटीस किंवा इतर कोणतीही कारवाई झाली तरी अवैध प्रकारांविरोधातील आपला लढा थांबणार नसल्याची भूमिका गंगाराम जांभेकर यांनी घेतली आहे. दरम्यान, जांभेकर यांनी केलेल्या अवैध रेती तस्करी आणि इतर अवैध व्यवसायांच्या आरोपांवर तसेच नोटीस बजावण्यामागील प्रशासनाची नेमकी भूमिका काय आहे, हेही आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button