अमरावतीत ज्वेलर्स दुकान फोडून ६ लाख २० हजारांचा ऐवज लंपास!

पलाश लाईनमधील वरणकर ज्वेलर्सचे शटर तोडून ४ किलो चांदी आणि २२ ग्रॅम सोने चोरीला; गाडगेनगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू
अमरावती : अमरावती शहरातील पलाश लाईन परिसरात ज्वेलर्स दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी वरणकर ज्वेलर्सचे शटर आणि कुलूप तोडून सुमारे ६ लाख २० हजार रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने चोरी करून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गाडगेनगर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दुकानाचे मालक पंकज सदाशिवराव वरणकर यांच्या तक्रारीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता दुकान व्यवस्थित कुलूप लावून बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुकान बंद असतानाच अज्ञात चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले.
११ सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास दुकानाचे मालक लाणे सुमित उमप यांनी दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पंकज वरणकर यांना फोनवरून दिली. माहिती मिळताच त्यांनी तातडीने दुकान गाठून पाहणी केली.
दुकानात प्रवेश केल्यानंतर आतील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. दागिन्यांची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समोर आले.
चोरट्यांनी सुमारे ४ किलो चांदीचे दागिने आणि वस्तू लंपास केल्या आहेत. यामध्ये ब्रासलेट, तगडी, जोडवे, बिच्चवे, दिवे, ग्लास आणि वाटी अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. चोरी गेलेल्या चांदीच्या ऐवजाची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय सुमारे २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही चोरीला गेले आहेत. यामध्ये कानातले रिंग, पेंडाल, नथ, बेसर, लॉकेट, बघा रिंग, सोन्याचा तुकडा आणि लहान बिस्किट यांचा समावेश आहे. या सोन्याच्या ऐवजाची किंमत सुमारे २ लाख २० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
अशाप्रकारे सोने आणि चांदीचे मिळून एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
या प्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकानाचे शटर आणि कुलूप तोडून चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांचा गाडगेनगर पोलीस शोध घेत आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू असून, चोरट्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.



