नागपूर-जबलपूर महामार्गावर भीषण अपघात; २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

कांद्री वस्ती येथे दोन दुचाकींची धडक; दोघे गंभीर जखमी, रामटेक उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रामटेक : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री वस्ती येथे दोन दुचाकींची भीषण धडक होऊन गंभीर अपघात झाला. या दुर्घटनेत एका २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
१० सप्टेंबर रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास हा अपघात घडला. आकाश रतिराम भरडे, वय २६, अरविंद मदन नायक आणि विशाल विनोद भलावी हे तिघेही देवरी बोरडा येथील रहिवासी असून, मोटरसायकल क्रमांक MH 40 DA 5419 वरून कांद्री वस्ती येथून देवरीच्या दिशेने जात होते.
याचवेळी सोबत जात असलेल्या दुसऱ्या दुचाकीला त्यांच्या दुचाकीची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की तिघेही रस्त्यावर कोसळले. या भीषण अपघातात आकाश भरडे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर अरविंद नायक आणि विशाल भलावी हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच टोल प्लाझाची रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची नोंद घेतली. दोन दुचाकींची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, तसेच अपघातासाठी जबाबदार परिस्थिती काय होती, याचा तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
कांद्री वस्ती परिसरात घडलेल्या या भीषण अपघातामुळे देवरी बोरडा परिसरातही शोककळा पसरली असून, एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातामागील नेमके कारण पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
सिटी न्यूजसाठी अजय मेहरकुळे, रामटेक



