AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत बैलपोळ्याचा उत्साह; यशोमती ठाकूर यांनी केले सर्जा राजाचे पूजन

माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर आणि पुष्पमालाताई ठाकूर यांच्या हस्ते बैलांचे विधिवत पूजन; पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत व्यक्त केली कृतज्ञता

अमरावती : शेतकऱ्यांचा खरा साथीदार असलेल्या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत अमरावतीत बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी आपल्या निवासस्थानी बैलांचे विधिवत पूजन केले. यावेळी त्यांच्या मातोश्री पुष्पमालाताई ठाकूर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

परंपरेनुसार ॲड. यशोमती ठाकूर आणि पुष्पमालाताई ठाकूर यांनी बैलांना ओवाळून त्यांच्या गळ्यात शाल आणि माळ घालत पूजन केले. तसेच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवण्यात आला. वर्षभर शेतीच्या कामात राबणाऱ्या बैलांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत ठाकूर कुटुंबीयांनी बैलपोळ्याची परंपरा जपली.

यावेळी बोलताना ॲड. यशोमती ठाकूर यांनी कृषीप्रधान संस्कृतीमध्ये बैलाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. वर्षभर शेतात मेहनत करणारा बैल हा केवळ प्राणी नसून शेतकऱ्याचा सच्चा सखा आणि कुटुंबातील सदस्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या पारंपरिक सोहळ्यात ठाकूर कुटुंबीयांसह कार्यकर्ते, शेतकरी बांधव आणि नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. बैलांच्या पूजनातून शेतकरी आणि सर्जा राजामधील जिव्हाळ्याचे नाते तसेच ग्रामीण संस्कृतीतील कृतज्ञतेची भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

अमरावतीत पारंपरिक पद्धतीने साजरा झालेल्या या बैलपोळा उत्सवामुळे शहरातही ग्रामीण संस्कृतीचा आणि शेतकरी परंपरेचा सुंदर अनुभव पाहायला मिळाला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button