यवतमाळमध्ये सकल मातंग समाजाचा जनआक्रोश महामोर्चा; SC आरक्षणाच्या ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची मागणी

आरक्षणाचा समान लाभ मिळत नसल्याचा आयोजकांचा दावा; मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
यवतमाळ : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील ‘अ, ब, क, ड’ अशा उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने यवतमाळमध्ये भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नेते आणि राज्य समन्वयक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.
२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून या महामोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहोचला. त्यानंतर मोर्चाचं रूपांतर भव्य सभेत झालं.
अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट असलेल्या ५९ जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळत नसल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिलेल्या घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा, यासाठी अनुसूचित जातींच्या आरक्षणाचं ‘अ, ब, क, ड’ अशा पद्धतीने उपवर्गीकरण करण्यात यावं, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

महामोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नेते आणि राज्य समन्वयक सहभागी झाले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन न्याय्य मागणी पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली.
आरक्षणाच्या लाभामध्ये अधिक न्याय्य वाटप व्हावं आणि सामाजिकदृष्ट्या मागे राहिलेल्या घटकांना त्यांचा हक्क मिळावा, या उद्देशाने ही मागणी असल्याचं आयोजकांनी सांगितलं.
दरम्यान, मागणीची पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही सकल मातंग समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
यवतमाळमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव रस्त्यावर उतरल्याने उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, या मागणीवर राज्य सरकार आणि प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.



