अंबाझरी तलावात १६ वर्षीय मुलीने मारली उडी; सतर्क जलतरणपटूंनी वाचवले प्राण

शार्क एक्वाटिक क्लबच्या जलतरणपटूंचे प्रसंगावधान; धाडसी बचावकार्याबद्दल पोलिसांसह जलतरणपटूंचा सत्कार
नागपूर : घरच्यांना न सांगता घरातून निघून गेलेल्या १६ वर्षीय मुलीने अंबाझरी तलावात उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली. मात्र, तलावात सराव करणाऱ्या शार्क एक्वाटिक क्लबच्या सतर्क जलतरणपटूंनी प्रसंगावधान राखत तात्काळ पाण्यात उतरून मुलीला सुरक्षित बाहेर काढले. उपचारानंतर मुलगी सुखरूप असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास सीताबर्डी परिसरातून घरच्यांना न सांगता निघून गेलेली १६ वर्षीय निशिता सोनवणे अंबाझरी तलावात पोहोचली. त्यानंतर तिने तलावात उडी मारली.
यावेळी तलावात सराव करणाऱ्या शार्क एक्वाटिक क्लबच्या जलतरणपटूंच्या निदर्शनास ही बाब आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली आणि निशिताला सुरक्षितपणे तलावाबाहेर काढले.
बचावकार्यानंतर निशिताला तातडीने लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर तिची प्रकृती सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेत जलतरणपटूंनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. त्यांच्या धाडसी बचावकार्याचे कौतुक करण्यात आले. तसेच या बचावकार्यात सहकार्य करणाऱ्या पोलिसांचाही अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अंबाझरी तलावातील या घटनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्परता आणि योग्य वेळी केलेली मदत किती महत्त्वाची ठरू शकते, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. सतर्क जलतरणपटू आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे १६ वर्षीय मुलीचे प्राण वाचले.



