नागपुरात रेल्वे अंडरब्रिजजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

अंदाजे ३० वर्षीय पुरुषाचा मृत्यू; ईमामवाडा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद, ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू
नागपूर | प्रतिनिधी
नागपुरातील ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे अंडरब्रिजजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ११ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास नागपूर-अजनी रेल्वे इंक्लाइन केबिनकडून धंतोली अंडरब्रिजकडे जाणाऱ्या सिमेंट रोडवर अंदाजे ३० वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
नाकातून आणि डोळ्याजवळ रक्तस्राव
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने रंगीबेरंगी फुलांच्या डिझाइनचा बाह्यांचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट परिधान केली होती. त्याच्या गळ्यात धागा आणि हिरव्या रंगाचा ताईतही होता.
विशेष म्हणजे, मृत व्यक्तीच्या नाकातून तसेच डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ रक्तस्राव झाल्याचे आढळून आले. त्यामुळे मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
रेल्वे क्रॉसिंगवरील केबिन पॉईंट्समन सुनील बालाजी गुमडेळवार यांच्या सूचनेवरून ईमामवाडा पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि पुढील पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न
दरम्यान, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी ईमामवाडा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी ईमामवाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जयवंत पाटील करत आहेत. मृत्यूचे कारण काय आणि मृत व्यक्तीची ओळख कोणती, याचा उलगडा आता पोलीस तपासानंतरच होणार आहे.



