BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

वीर जवान हवालदार हरिदास कापसे यांना अश्रुपूर्ण निरोप

उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना वीरमरण; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा ऋग्वेदने दिला मुखाग्नी

चिखली | प्रतिनिधी

उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना चिखली तालुक्यातील शेलसूर येथील ३६ वर्षीय हवालदार हरिदास कापसे यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चिखली शहरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली. आज हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीर जवान कापसे यांना अश्रुपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला.

वीर जवानाच्या अंतिम दर्शनासाठी नागरिकांची गर्दी

हरिदास कापसे यांचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या चिखली येथील निवासस्थानी आणण्यात आले. आपल्या वीरपुत्राचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

त्यानंतर शहरातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी ‘अमर रहे, अमर रहे’ अशा घोषणा देत भारतमातेच्या या वीरपुत्राला अखेरचा सलाम केला. विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

चिखली येथील क्रीडा संकुल मैदानावर हवालदार हरिदास कापसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आर्मी जवान आणि पोलिसांनी तीन राऊंड फायरिंग करत वीर जवानाला मानवंदना दिली.

या वेळी कापसे कुटुंबीयांसह उपस्थित नागरिकांमध्ये भावनांचा बांध फुटला. वीर जवानाचा मुलगा ऋग्वेद याने आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. हा हृदयस्पर्शी क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

कुटुंबीयांसाठी जपलेला शेवटचा आनंदाचा क्षण

देशसेवेचे कर्तव्य बजावत असतानाही हरिदास कापसे यांनी आपल्या कुटुंबीयांप्रती असलेले प्रेम आणि जिव्हाळा कायम जपला होता. मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तिला ऑनलाइन भेट पाठवली होती. मुलगी केक कापत असताना त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे तिच्यासोबत हा आनंदाचा क्षणही शेअर केला होता.

मात्र, कुटुंबीयांसाठी आनंदाचा ठरलेला हा क्षण काही काळातच दुःखात बदलला. देशसेवेच्या कर्तव्यावर असताना हरिदास कापसे यांना वीरमरण आल्याने कापसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संपूर्ण जिल्ह्याचा वीरपुत्राला सलाम

देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हवालदार हरिदास कापसे यांच्या बलिदानाला आज संपूर्ण चिखलीकर आणि बुलढाणा जिल्ह्याने अभिवादन केले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

एका कुटुंबाने आपला आधार गमावला असला तरी देशसेवेसाठी दिलेले हवालदार हरिदास कापसे यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील.

वीर जवान हवालदार हरिदास कापसे यांना सिटी न्यूज परिवाराची भावपूर्ण श्रद्धांजली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button