AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दोन आरोपी ताब्यात, ₹34 हजारांचा मुद्देमाल जप्त

विद्यापीठ रोडवरील पान सेंटरमध्ये वेबसाइटद्वारे सुरू होता अवैध ऑनलाइन चक्री जुगार; फ्रेजरपुरा पोलिसांत गुन्हा दाखल

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरात अवैध ऑनलाइन जुगाराविरोधात गुन्हेशाखेने मोठी कारवाई करत विद्यापीठ रोडवरील एका पान सेंटरवर सुरू असलेले ऑनलाइन चक्री जुगाराचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ३४ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीच्या आधारे अमरावती शहर गुन्हेशाखेच्या पथकाने विद्यापीठ रोडवरील रॉक आर्केड कॉम्प्लेक्समधील स्मोकी बाइट्स पान अँड टी सेंटर येथे छापा टाकला. धाडीदरम्यान दुकानातील टीव्ही स्क्रीनवर ‘फन टार्गेट’ या वेबसाइटच्या माध्यमातून अवैध ऑनलाइन चक्री जुगार सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या कारवाईदरम्यान सूरज उर्फ भुऱ्या बबन ढोके (वय १९) आणि तेजस राजकुमार गूडधे (वय २२) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींकडून रोख रक्कम तसेच ऑनलाइन जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

ऑनलाइन जुगाराच्या माध्यमातून युवकांना आकर्षित करून आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर व्यवहारांना चालना देणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, शहरातील अशा अवैध धंद्यांवर भविष्यातही सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत या धाडीतून मिळाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button