अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४२ गोवंशांची सुटका, पाच आरोपींवर गुन्हे दाखल

शिरजगाव कसबा पोलिसांची धडक मोहीम; ९ लाखांहून अधिक किमतीचा गोवंश आणि गोमांस जप्त, अवैध कत्तलखान्यांवर कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध गोवंश वाहतूक, गोमांस विक्री आणि कत्तलखान्यांविरोधात मोठी धडक कारवाई करत शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल ४२ गोवंशांची सुटका करण्यात आली असून २३० किलो गोमांस आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार शिरजगाव कसबा पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
कारवाईदरम्यान आरोपी शेख फिरोज अब्दुल अजीज, शेख अब्दुल रज्जाक, साहिल शेख अश्रफ, शेख सहदू शेख वाहिद आणि रफेय जुनेद शेख जमील यांच्या ताब्यातून एकूण ४२ जिवंत गोवंश, २३० किलो गोमांस तसेच गोवंश कापण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ९ लाख १५ हजार ५५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी सापडलेले गोमांस पंचनामा करून जप्त करण्यात आले असून, गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. तसेच कानावर ओळख पट्ट्या (Ear Tagging) असलेल्या जनावरांची संबंधित मालकांपर्यंत पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९९५ (सुधारित २०१५) तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार स्वतंत्र गुन्हे शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अविनाश बारगळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.
अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधातील ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलिसांसाठी महत्त्वाचे यश मानली जात असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



