अजिंठ्यात विद्यार्थी परिषद निवडणुकीतून लोकशाहीचा प्रत्यक्ष धडा

नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूलचा अभिनव उपक्रम; मतदान, प्रचार आणि निकाल प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
अजिंठा | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी अजिंठा येथील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थी परिषद निवडणुकीचे उत्साहात आयोजन केले. उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान आणि मतमोजणी अशा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाहीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. निवडणुकीसाठी एकूण २० विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विविध गटांतून सहा विद्यार्थ्यांची विद्यार्थी परिषदेसाठी निवड करण्यात आली.
इयत्ता पाचवी ते सातवी गटात मुलींच्या प्रतिनिधी म्हणून मरियम शेख आसिफ, तर मुलांच्या प्रतिनिधी म्हणून अर्श शेख साबिर विजयी झाले.
इयत्ता आठवी ते दहावी गटात मुलींच्या प्रतिनिधी म्हणून मिसबाह शेख अनीस, तर मुलांच्या प्रतिनिधी म्हणून बिलाल झहीर खान यांची निवड झाली.
अकरावी ते बारावी गटात मुलींच्या प्रतिनिधी म्हणून आयशा अहमद खान, तर मुलांच्या प्रतिनिधी म्हणून सोहेल अहमद खान यांनी विजय मिळवला.
मतदान प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा प्रत्यक्ष अनुभवला. या उपक्रमामुळे मतदानाचे महत्त्व, जबाबदार नेतृत्वाची निवड आणि लोकशाही मूल्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या निवडणुकीचे आयोजन वरिष्ठ शिक्षक शेख आसिफ यांनी केले. शिक्षक शेख नूर, जाकीर, अमान, वकील, नदीम आणि नवीद यांनीही आयोजनात सक्रिय योगदान दिले. शाळेचे पर्यवेक्षक सय्यद मुईजोद्दीन आणि प्राचार्य सय्यद मुनिरोद्दीन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली.
या अभिनव उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि स्थानिक नागरिकांकडूनही कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारी आणि लोकशाही संस्कार रुजविण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
अजिंठ्यातील नेहरू मेमोरियल उर्दू हायस्कूलने राबविलेला हा उपक्रम इतर शैक्षणिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, लोकशाहीचे शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा आदर्श निर्माण केला आहे.



