कळमना पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कामगिरी; आरोपी अटकेत, ₹१ लाखांचा मुद्देमाल जप्त

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल; लग्नासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात झाली होती चोरी
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची अवघ्या काही दिवसांत उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीतील सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २३ जून रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह गुमगाव येथे चुलत भावाच्या लग्नासाठी गेले होते. घराला कुलूप लावून ते बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत आल्यावर घराच्या मुख्य दरवाजाची कडी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
घरात प्रवेश करून पाहिले असता लोखंडी कपाट उघडे असल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, एक लॅपटॉप, एक कॅमेरा तसेच रोख रक्कम चोरून नेल्याचे उघड झाले. याप्रकरणी कळमना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सुमारे १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. यासोबतच मिळालेल्या विश्वासार्ह गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून, चोरीतील उर्वरित मुद्देमालाचा शोध आणि आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होते का, याचा तपास सुरू आहे.
दरम्यान, घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घर दीर्घकाळ बंद ठेवताना शेजाऱ्यांना माहिती देणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, तसेच मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



