citynewsLatest NewsMaharashtraWardha

वर्ध्यात आयएमएचे २४ तासांचे वैद्यकीय सेवा बंद आंदोलन; प्रमुख मागण्यांसाठी खासगी दवाखाने बंद

सीसीएमपीधारक बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाला विरोध; आपत्कालीन सेवा मात्र सुरू

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा शहरात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या वतीने विविध मागण्यांसाठी २४ तासांच्या वैद्यकीय सेवा बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा, तसेच आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ कायदेशीररित्या पात्र आणि नोंदणीकृत एमबीबीएस डॉक्टरांनाच करण्याची परवानगी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

आयएमएच्या नेतृत्वाखाली वर्ध्यातील अनेक खासगी डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक खासगी दवाखाने दिवसभर बंद ठेवण्यात आले.

आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे की, आधुनिक वैद्यकशास्त्राची गुणवत्ता, वैज्ञानिकता आणि कायदेशीर मानके कायम राखण्यासाठी आधुनिक वैद्यकाचा सराव केवळ कायदेशीर पात्रता आणि नोंदणी असलेल्या आधुनिक वैद्यकीय पदवीधारकांनाच करण्याची परवानगी असावी. सीसीएमपी पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याचा कोणताही प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

मात्र, आंदोलनादरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी अतितातडीची आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे गंभीर आणि आपत्कालीन रुग्णांना आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

आयएमएने स्पष्ट केले आहे की, हे आंदोलन रुग्णांच्या सुरक्षिततेसह आधुनिक वैद्यकाची गुणवत्ता आणि कायदेशीर मानके कायम राखण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. या मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही संघटनेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, या आंदोलनामुळे वर्ध्यातील नियमित ओपीडी सेवा काही प्रमाणात प्रभावित झाली असून, डॉक्टरांच्या मागण्यांबाबत राज्य शासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button