नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; एक किलोहून अधिक गांजासह आरोपी अटकेत

भांडेवाडी हद्दीतील मध्यरात्रीच्या छाप्यात ₹38 हजारांचा मुद्देमाल जप्त; मुख्य संशयित अद्याप फरार
नागपूर | प्रतिनिधी
नागपूर शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एक किलोहून अधिक गांजासह एका आरोपीला अटक केली आहे. भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 38 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी मध्यरात्री भंडारा–नागपूर रोडलगत जुना पारडी नाका परिसरातील सातपुते पानठेल्यासमोर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने विशेष छापा टाकला. यावेळी मोहम्मद जावेद उर्फ दुर्गेश हिरालाल चौरसिया (वय 24) याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 1 किलो 125 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त गांजाची अंदाजे किंमत 28 हजार 125 रुपये असून, त्याच्याकडील मोबाईल फोन आणि इतर साहित्यांसह एकूण 38 हजार 125 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 20(ब)(2)(ब) आणि 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे फिर्यादी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित ललित श्रीवास्तव हा अद्याप फरार असून त्याचा शोध पोलीस युद्धपातळीवर घेत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित आरोपीविरुद्ध यापूर्वी एनडीपीएस कायद्यांतर्गत 11 गुन्हे नोंद आहेत. याशिवाय त्याच्यावर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे प्रत्येकी एक गंभीर गुन्हेही दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या संपूर्ण अमली पदार्थांच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेकडून अधिक सखोल तपास सुरू असून, फरार आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. नागपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवत अशा गुन्ह्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.



